सोमवार, ११ जुलै, २०१६

उशिर....




कधीतरी होशील तू राजी,
कधीतरी लागेल तुला ओढ माझी.
पण येशील तेव्हा
दारात असेल बायको माझी.
तू येण्याआधीच केली असेल
तिने हजामत माझी.

शेंबडं पोरं काखेत मारत
विचारेल तुला,
" कोण हवंय बाई तुम्हाला?"
तू म्हणशील, " तो आहे का घरात?"
ती म्हणेल,"त्यांना काय धाड भरलीय.....
...अहो तुम्हाला भेटायला एक सटवी आलीय"

लुंगी सावरत मी बाहेर येईन,
तुला ओळखूनही अनोळख्यागत वागेन.
मग उगाच आठवल्याचं नाटक करत
तुला घरात बोलवेन.
तुझी विचारपूस करेन,
तुला चहा विचारेन.
पण तेवढ्यात बायको म्हणेल,
"दूध फाटलंय...माझ्या नशिबासारखं.."
मी पाहीन तिच्याकडे,
उगाच रागावल्यासारखं...

बायकोचे कान टवकारलेले असतील,
नि डोळे वटारलेले.
माझेही मन असेल
थोडे काहूरलेले...
तू लाडात येशील,
एक गालगुच्चा घेशील....
माझ्या मुलाचा.
एक आवाज होईल
गालात मारल्याचा.
मी रागवेन मुलावर
नि बायको माझ्यावर..

मुलाचं रडणं,
बायकोचं ओरडणं
तुला सहन व्हायचं नाही.
काय करु, बायकोपुढे
मला बोलता यायचं नाही.

तू परत फिरशील आल्या पावलांनी
बघशील मला ओल्या डोळ्यांनी.
माझेही डोळे असतील ओले,
बायकोने कापलेल्या कांद्यांनी.

तू निघून जाशील नि
घरात महाभारत होईल.
तू येशील तोवर
खूप उशिर होईल...
खरंच खूप उशिर होईल...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा